महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे. मनसे मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेय खोपकर यांनी हे ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”.

महाअधिवेशनात राज ठाकरे काही मोठे बदल करणार असून पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरुन तसे संकेत मिळत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग असणार असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे. या झेंड्याचा फोटोही समोर आला आहे.

आणखी वाचा – मनसेचा नवा झेंडा पाहिलात का? स्थापनेनंतर १४ वर्षांनी बदलणार झेंड्याचा रंग

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेकडून दोन झेंडे तयार केले आहेत. हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. एका झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असून दुसऱ्यावर निवडणूक चिन्ह इंजिन आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही झेंड्यांवर भगव्या रंग कायम आहे. मनसेच्या सध्याच्या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलला जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra navnirman sena amey khopkar shivsena balasaheb thackeray sgy
First published on: 22-01-2020 at 10:29 IST