News Flash

राष्ट्रवादीला खरा धोका स्वकीयांच्या साठमारीचा

लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरीतून पक्षसंघटनासाठी दौऱ्याचा शुभारंभ केला...

| August 20, 2015 02:35 am

लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरीतून पक्षसंघटनासाठी दौऱ्याचा शुभारंभ केला असला तरी या जिल्ह्य़ात या पक्षाला स्वकीयांच्याच साटमारीचा खरा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगल्या प्रकारे हात-पाय पसरायला सुरुवात केली होती.
रत्नागिरी जिल्ह्य़ात माजी मंत्री भास्कर जाधव, उदय सामंत, रवींद्र माने यांच्यासह माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम इत्यादी मातब्बर नेतेमंडळींचा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आमदार दीपक केसरकर यांचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता.
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामंत आणि केसरकर हे दोन नेते शिवसेनेच्या तंबूत दाखल झाल्यामुळे दक्षिण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतही या पक्षाची पकड ढिली पडली. त्यातच चिपळूण तालुक्यात माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि माजी आमदार कदम यांच्यातील भांडण विकोपाला जाऊन जाधवांना पदावरून हटवेपर्यंत पक्षामध्ये न राहण्याची धमकी कदम यांनी दिली इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याविरुद्ध निवडणूकही लढवली. मात्र त्यानंतर थोडय़ाच काळात त्यांना सन्मानाने पक्षात पुन्हा प्रवेश देऊन पदाधिकारी करण्यात आल्यामुळे जाधवांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले. दुसरीकडे तटकरे आणि जाधव यांच्यातही पूर्वापार राजकीय वैमनस्य असून दोन वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ते चव्हाटय़ावर आले. रत्नागिरीतील पक्षाचे तत्कालीन आमदार सामंत यांनाही तटकरे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत जाधव विरुद्ध तटकरेंच्या आशीर्वादाने कदम, निकम आणि सामंत अशी नेत्यांची साटमारी चालू असल्याचे चित्र निर्माण झाले. यापैकी आमदार सामंत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडले असले तरी चिपळूण तालुक्यात जाधव विरुद्ध कदम आणि निकम असे शीतयुद्ध अबाधित राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिपळुणातून जेमतेम सहा हजार मतांनी पराभव पत्कारावा लागलेल्या निकम यांना तेच भोवल्याचे उघडपणे बोलले जाते.
या पाश्र्वभूमीवर तटकरे यांनी काल रत्नागिरीत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, माजी प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी सर्वाना बरोबर घेऊन जिल्ह्य़ात पक्षाची नव्याने बांधणी करावी, असा शहाजोगपणाचा सल्ला दिला. पण त्या वेळी त्यांच्यासह व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या आणि सभागृहातील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बरेच काही सांगून गेले. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष निकम यांनी संघटनात्मक बांधणीची गरज व्यक्त केली. आमदार सामंतांच्या कुरापतींचाही सर्व नेत्यांनी उल्लेख केला. पण आपल्या विरोधात एकेकाळी आमदार सामंत यांना बळ देणाऱ्यांनीच आता हे पाप गाडून टाकावे, असे जाधव यांनी थेट तटकरेंना सुचवत मर्मावर बोट ठेवले.
तटकरेंच्या आशीर्वादाने आपल्या विरोधात झालेल्या कारवायांचे शल्य ते विसरू शकलेले नाहीत, हेच त्यातून उघड झाले. माजी आमदार कदम मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित होते. पण त्यांनी जणू मौनव्रत धारण केले होते. जाधव-तटकरे यांच्यात झालेल्या टोलेबाजीवरही त्यांनी अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत जाधवांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून केलेली बंडखोरी ते विसरलेले नाहीत, हेच त्यातून व्यक्त झाले.
जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी दापोली (संजय कदम) आणि गुहागर (भास्कर जाधव) राष्ट्रवादीकडे असल्यामुळे या दोन तालुक्यांसह खेड आणि चिपळूण तालुक्याच्या काही भागात या पक्षाचा प्रभाव टिकून आहे. पण संगमेश्वरपासून राजापूपर्यंत नेते आणि कार्यकर्ते या दोन्हीची वानवाच दिसून येते. चिपळूण तालुक्यातील जाधवकद म-निकम हे त्रिकूट भूतकाळ विसरून एकत्र येण्याची शक्यता दिसत नाही. पक्ष नेतृत्वाकडूनही हे गटा- तटाचे राजकारण मिटवण्यासाठी मनापासून प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत पक्ष बळकटीकरणाच्या मोहिमेवर निघालेल्या प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना शुभारंभातच अपशकून अटळ होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 2:35 am

Web Title: maharashtra ncp chief sunil tatkare to visit konkan
टॅग : Ncp,Sunil Tatkare
Next Stories
1 अंनिसचे राज्यव्यापी आंदोलन आज
2 कुंभमेळा सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत – अमित शहा
3 मुंबई-गोवा महामार्गावरील टोलच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा विरोध
Just Now!
X