प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा स्वपक्षीयांना खणखणीत इशारा

चंद्रपूर : रस्त्यावर उतरून काम करण्याऐवजी केवळ पद घेऊन घरी बसण्यापेक्षा, पक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा, दुसऱ्यांना संधी दिली जाईल या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना खडे बोल सुनावले आणि कानपिचक्यासुद्धा घेतल्या. पक्षाच्या आढावा बैठकीला अत्यल्प पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बघून जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी आडव्या हाताने घेतले.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, प्रदेश पदाधिकारी राजेंद्र वैद्य, महिला अध्यक्ष बेबी उईके, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, सुदर्शन निमकर, शोभा पोटदुखे, संजय वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाटील यांनी सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष तथा पक्ष प्रवक्त्यांकडून त्यांनी जिल्हय़ात आजवर केलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. मात्र, यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने खरी व सविस्तर माहिती सादर करता न आल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावताना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या.

रस्त्यावर उतरून, लोकांमध्ये जाऊन पक्षाचे काम करता येत नसेल तर पदाधिकाऱ्यांनी घरी बसावे, पक्षाचे पद घेऊन ते अडवून ठेवणे योग्य नाही, तेव्हा अशा पदाधिकाऱ्यांनी पद सोडावे, त्यांच्या जागेवर नवीन लोकांना संधी दिली जाईल, असे म्हणून त्यांनी काम करा, अन्यथा पद सोडा, असा संदेश दिला.

दरम्यान, पक्षाच्या बैठकीला अतिशय अल्प पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बघून त्यांनी संतापही व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हय़ातील तसेच चंद्रपूर शहरातील व्यापारी व प्रतिष्ठित लोकांची बैठक घेऊन त्यांच्याकडूनही मते जाणून घेतली.