जगातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने भारतात पाऊल ठेवण्यासाठी महाराष्ट्राऐवजी कर्नाटकची निवड केली. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी महाराष्ट्राने आणि आपण सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
“आज महाराष्ट्राने प्रयत्न करुनही टेस्लाने कर्नाटकचा विचार केला. पण सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचं असतं तर त्यांनी प्राधान्यानं महाराष्ट्राचा विचार केला असता…आपण सर्वांनी गंभीर होत याचा विचार केला पाहिजे”, असं ट्विट शिदोरे यांनी केलं आहे.
सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचं असतं तर त्यांनी प्राधान्यानं महाराष्ट्राचा विचार केला असता. आज महाराष्ट्रानं प्रयत्न करूनही त्यांनी कर्नाटकचा विचार केला.. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे..
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) January 13, 2021
दरम्यान, भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमधून टेस्ला आपल्या व्यवसायाला सुरूवात करणार असून इथेच कंपनीने रजिस्ट्रेशन केलंय. यासोबतच कंपनीने तीन डायरेक्टर्सचीही नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेंस्टीन यांची डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. 8 जानेवारी रोजी कंपनीने नोंदणी केली असून नोंदणी नंबर 142975 आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनीही टेस्लाचं कर्नाटकात स्वागत केलंय. ‘मी एलन मस्क आणि टेस्लाचं भारतात व कर्नाटकात स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासाचं नेतृत्त्व करेल’, असं येडियुरप्पा म्हणाले.
आणखी वाचा- ‘बोलाची कढी, बोलाचा भात’, Tesla कर्नाटकला गेल्याने मनसेने आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन काही दिवसांपूर्वी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. याशिवाय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टेस्ला (Tesla) २०२१च्या सुरुवातीला भारतात पदार्पण करेल असं म्हटलं होतं. टेस्ला ‘मॉडेल 3 ’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे. मॉडेल 3 ही सेडान प्रकारातली कार असून ती 0 ते 100 किमीप्रतितास इतका वेग केवळ 3.1 सेकंदात गाठू शकते. याची रेंज 500 किमी पेक्षा अधिक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:22 pm