एकीकडे महाराष्ट्रात देशभरात सर्वाधिक लसीकरण केलं जात असलं, तरी दुसरीकडे करोना दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र रुप धारण करू लागला आहे. वारंवार नियम पाळण्याचं आवाहन करून देखील नागरिकांकडून गर्दी केली जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. राज्यातल्या आजच्या आकडेवारीनुसार तब्बल २९७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद दिवसभरात झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ३३० एवढा झाला आहे. त्यासोबतच आज दिवसभरात ५५ हजार ४६९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा ३१ लाख १३ हजार ३५४ वर गेला आहे. यापैकी ४ लाख ७२ हजार २८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा सातत्याने ५० हजारांच्या वर जात आहे. तसेच, मृतांचा आकडा देखील वाढल्यामुळे राज्य सरकारकडून नुकतेच संपूर्ण लॉकडाऊन न करता नवे निर्बंध लादण्यात आले आहेत.

पुण्यात एकाच दिवसात ५६०० नवे, तर ३८ मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ६०० करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर २ लाख ९९ हजार ७२१ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार ५२६ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३ हजार ४८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ४९ हजार ३७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

 

मुंबईत १० हजार ३० नवे रुग्ण!

दरम्यान, पुण्याप्रमाणेच मुंबईत देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एकूण १० हजार ३० नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोना मृतांची संख्या ११ हजार ८२८ इतकी झाली आहे. त्यासोबतच, करोनाबाधितांची संख्या देखील ४ लाख ७२ हजार ३३२ इतकी झाली आहे.