राज्य सरकारनं काही अटींसह मद्य विक्री करण्यास मान्यता दिली. पण, त्यानंतर रस्त्यावर दिसणाऱ्या गर्दीमुळे सरकारला धडकीच भरली. तातडीनं काही ठिकाणी मद्यविक्री बंद करण्यात आली. त्यानंतर सरकारनं घरपोच मद्यसेवा (ई-टोकन) विक्री करण्याचा निर्णय घेतला. आज, शनिवारपासून घरपोच मद्यविक्रीला सुरूवात झाली. दिवसभरात राज्यातील पाच हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री केल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

घरपोच मद्यविक्रीसाठी राज्यातून लातूर आणि नागपूर या दोन शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागपूर आणि लातूर या शहरातून तब्बल ८८ टक्के ग्राहक आहेत. राज्यातील एकूण ग्राहकांपैकी चार हजार ८७५ ग्राहक या दोन शहरातील असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

तीन मे पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात ( ३ ड्राय जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ४५९७ अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उमाप यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उलब्ध केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. मद्य खरेदी करण्यासाठी ई-टोकन कसं मिळवायचं याबद्दल एक व्हिडीओ उत्पादन शुल्क विभागानं जारी केला आहे. त्यात संपूर्ण प्रक्रियेची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे.