पंढरपुरातून एक दिलासादाय बातमी समोर आली आहे. पंढरपुरात एकाच दिवशी तब्बल २५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकीकडे तालुक्यात करोना रुग्णाची संख्या वाढत असताना आता रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत एकूण ८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यातील वाखारी येथील कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २५ जणांना कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आणि १० दिवस पूर्ण उपचार देऊन त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील ८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोनामुक्त झालेल्या २५ जणांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रदिप केचे, डॉ. धनंजय सरोदे, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी व करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवित असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. तर करोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यात आयसीएमआरच्या सूचनांनुसार अँटीजन टेस्टिंग सुरु झाल्या आहेत. अँटीजन टेस्टिंगद्वारे संशयितांच्या तपासण्या केल्या जात असून त्याचा तपासणी अहवाल अर्ध्या तासात उपलब्ध होत आहे. त्यामुळे सुरुवातील काही दिवस बाधितांची संख्या वाढत असताना दिसत आहे. तालुक्यात रुग्ण व्यवस्थापनेमुळे वेळेत उपचार उपलब्ध होत असून करोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.