बिपीन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्ह्यांमध्ये वाढ होऊनही सायबर पोलीस ठाणी कागदावरच

महाराष्ट्र सायबर प्रकल्पा अंतर्गत सर्व जिल्हय़ांमध्ये अद्ययावत सायबर पोलीस ठाणी उभारण्याची दोन वर्षांपूर्वी केलेली घोषणा कागदावरच आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस ठाणी सुरू झाली नसल्याने सर्व मदार केवळ पोलिसांच्या ‘सायबर सेल’वर आहे.

पुण्यातील एका बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आणि गतवर्षीच्या आकडेवारीनुसार सायबर गुन्हय़ांमध्ये ४१ टक्के वाढ होऊनही सायबर ठाणी सुरू करण्याचे काम गती घेताना दिसत नाही. सध्या पोलिसांच्या सायबर सेलमधून सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) आणि एसडीआर (सबस्क्राबर डिटेल्स रेकॉर्ड) तपासणीचे काम करण्यात येते. राज्यात एकाच वेळी ४७ सायबर पोलीस ठाणी सुरू करण्याची घोषणा १६ ऑगस्ट २०१६ रोजी करण्यात आली होती. त्यासाठी ६५० कोटींचा निधी देण्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु हे आश्वासन हवेत विरल्यात जमा आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयांमधील सायबर सेलच्या माध्यमातून एखाद्या गुन्हय़ातील मोबाइल कॉल्स, मोबाइलचा मूळ मालक कोण, हे तपासण्याचे काम चालते. सायबर सेल व सायबर ठाणे यात मोठा फरक आहे. सायबर पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र इमारत, पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी, त्याला साह्य करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि संगणकशास्त्रातील माहितगार, अत्याधुनिक यंत्रणा, गस्त घालण्यासाठी वाहन इत्यादीची आवश्यकता आहे. सायबर पोलिस तंत्रज्ञानातील कंपन्या, सायबर कॅफे यावर देखरेख ठेवतात. शिवाय समाजमाध्यमांतून पसरवण्यात येणाऱ्या अफवा, संदेश यावरही करडी नजर ठेवता येते. अफवा पसरवणाऱ्यांचा छडा सायबर पोलीस ठाण्यांमार्फत लावणे शक्य आहे. मात्र अशी ठाणीच नसल्यामुळे गुन्हय़ांचे प्रमाण वर्षांगणिक वाढते आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याबरोबरच पोलीस सेवेत असलेल्या संगणकशास्त्र शाखेच्या कर्मचाऱ्यांना या कामात सामावून घेणे अपेक्षित आहे.

गुन्ह्यांचा प्रतिबंध

सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असलेले आधुनिक प्रशिक्षण म्हणजे क्रिप्टोग्राफी, नेटवर्क, फॉरेन्सिक, मोबाइल डाटा फॉरेन्सिक, पेनेट्रेशन, लिनक्स ऑपरेटिंग, फायरवाल, हॅकिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग सध्यातरी पोलीस दलात अत्यल्प प्रमाणात आहे. ते वाढवण्याची गरज आहे.

मुंबई सायबर गुन्हय़ांचीही राजधानी

गेल्यावर्षी राज्यात ४ हजार ३५ सायबर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी एक हजार ३७ गुन्हय़ांचा तपास करण्यात आला. यंदा  ४१ टक्क्यांनी सायबर गुन्हे वाढले आहेत. देशात २०१६ मध्ये घडलेल्या सायबर गुन्हय़ांमध्ये मुंबईत सर्वाधिक गुन्हय़ांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ७६२ गुन्हे बंगळुरूमध्ये नोंदवण्यात आले. या बाबतीत  तिसरा क्रमांक जयपूरचा आहे. तेथे ५३२ गुन्ह्यांची  नोंद आहे.

सायबर गुन्हय़ांचे प्रकार : आयपीअ‍ॅड्रेस (संगणकाचे प्रत्यक्ष ठिकाण), टीसीपी-आयबी (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- नियमावली किंवा संहिता), वेब सव्‍‌र्हर यूआरएल (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर), फिशिंग (ठकविणे- हुबेहूब कंपनी, बँकेचा मेल पाठवणे), स्पुफिंग (बनावट मेल करणे), रॅन्समवेअर (ऑनलाइन खंडणी), बीटकॉइन फ्रॉड (आभासी चलन, एटीएम फ्रॉड (माहिती चोरणे), आयडेन्टिटी थेफ्ट, काली लिनक्स (हॅकर्सचे तंत्र) अशा प्रकारच्या गुन्हय़ांचा तपास करताना पोलीसांना अडचणी येतात.

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलमध्ये आतापर्यंत पाच गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील चार गुन्हय़ांचा तपास पूर्ण झाला आहे. एका महिलेची समाजमाध्यमावर बदनामी करणाऱ्या प्रकरणाचा छडा नुकताच लावण्यात आला.  – संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक, सायबर ठाणे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra police cybercrime
First published on: 03-09-2018 at 00:55 IST