पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये ३ वर्षीय चिमुरडीला १ जानेवारी रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने आईजवळून अपहरण करून पळवून नेले होते. घरापासून काही अंतरावर शेतात ही मुलगी वेदनेने विव्हळताना सापडली होती. या चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘स्निफर डॉग’च्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.

१ जानेवारीच्या रात्री तलासरी येथे ३ वर्षीय बालिका आपल्या आईसोबत घरासमोरच्या ओट्यावर झोपली असताना रोजंदारी काम करणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने तिला आईजवळून उचलून नेलं. आरोपी मुलीला घेऊन जात असतानाच आई उठली व जोरात ओरडली. आईने पती आणि अन्य शेजाऱ्यांसह आरोपीचा पाठलाग केला पण अंधाराचा फायदा उचलत तो बालिकेला घेऊन फरार झाला. नंतर घरापासून काही अंतरावर शेतात ही मुलगी वेदनेने विव्हळताना सापडली होती. त्यानंतर आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेले आणि अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रारही पोलिस स्थानकात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस सतर्क झाले. त्यांना घटनास्थळावरुन चपलांचा जोड मिळाला. तीन संशयितांभोवती तपास येऊन थांबला होता, पण बालिकेच्या आईला तिघांपैकी नेमका आरोपी कोण हे समजत नव्हतं. टाइम्स नाउच्या वृत्तानुसार, अखेर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेण्याचं ठरवलं. श्वान पथकातील एका स्निफर डॉगला घटनास्थळी सापडलेल्या चपलांचा वास देण्यात आला. त्यानंतर हा स्नीफर डॉग थेट आरोपी राहत असलेल्या झोपडीत पोहोचला.

आणखी वाचा- …म्हणून गृहमंत्र्यांनी मानले आयर्लंडच्या FB अधिकाऱ्यांचे आभार, मुंबई-धुळे पोलिसांचंही केलं कौतुक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दारूचे व्यसन आहे. यापूर्वी त्याने गावातील महिलेवव व रोजंदारी म्हणून काम करणाऱ्या फॅक्टरीतील महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते. अलीकडेच त्यांची पत्नी त्याला सोडून गेली होती. मुलीला तिच्या झोपडीतून पळवून नेल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला भाताच्या शेतात टाकून तो त्याच्या झोपडीकडे परतला. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), कलम 363 (अपहरण) आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.