News Flash

दर्डाविरोधात लोकमत प्रक्षुब्ध

आंदोलनाचे लोण पसरले, किशोर दर्डाच्या अटकेची मागणी

दर्डाविरोधात लोकमत प्रक्षुब्ध

यवतमाळमध्ये लाठीमार, गोळीबार, आंदोलनाचे लोण पसरले, किशोर दर्डाच्या अटकेची मागणी

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) या शाळेतील लंगिक छळप्रकरणी सुरू असलेले पालकांचे आंदोलन रविवारी हिंसक झाले असून, त्याचे लोण शहरात पसरू लागले आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा आणि सचिव किशोर दर्डा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रविवारी संतप्त जनतेचा पुन्हा उद्रेक झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी महिलांवर दगडफेक केल्याचा आरोप होत असून नागरिकांवर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या सात फैरी झाडल्याने जमाव भडकला होता. दरम्यान, किशोर दर्डा घरी नसल्याचे कळल्यावर त्यांच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलाला त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

खासदार निधीतून विजय दर्डा यांनी उभारलेल्या कामांचे जेथे जेथे फलक आहेत ते सर्व उखडून फेकण्याचा सपाटा संतप्त जमावाने लावला आहे. संतप्त जमावाने ‘दर्डा नाका’ चौकाला ‘दारव्हा नाका’ असे नाव दिले आहे. त्यामुळे या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. लोहाऱ्याजवळील दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयावरही दगडफेक करण्यात आली.  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आणि त्यांच्या ताफ्याने किशोर दर्डा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, पण दर्डा सापडले नाहीत. पोलीस संरक्षण असूनही किशोर दर्डा निसटलाच कसा, असा संतप्त सवाल महिला करीत होत्या. पोलिसांनीच दर्डाला फरार होण्यात मदत केली का, असा प्रश्न विचारला जात होता.  पोलिसांनी कितीही दगडफेक केली तरी विजय आणि  किशोर दर्डा यांना अटक होईपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका संतप्त आंदोलक महिलांनी घेतली आहे.

महिलांची प्रचंड उपस्थिती

दारव्हा नाक्यावरील दर्डाच्या निवासस्थानाजवळ रविवारी जनसमुदायाने ठिय्या दिला. त्यात महिलांची प्रचंड उपस्थिती होती. या वेळी या जमावाने दर्डा मातोश्री भवनाच्या काचा फोडल्या. या भवनात दगडांचा खच साचलेला होता. पोलिसांनी केलेली दगडफेक व लाठीमाराला संतप्त जमावानेही दगडफेकीनेच जोरदार प्रत्युत्तर दिले. या घटनेत एक पोलीस शिपाई आणि नागरिक जखमी झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 1:09 am

Web Title: maharashtra police register rape case against two teachers of yps
Next Stories
1 पाऊस दाटलेला..
2 राजापूर नगर परिषदेमध्ये महिलाराज येण्याचे संकेत
3 जळगावमध्ये पुरात मायलेकींचा मृत्यू
Just Now!
X