जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील ४८ तासांत २७८ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे राज्यात ७१ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या राज्यात १ हजार ११३ पोलीसांवर उपचार सुरू आहेत.

याचबरोबर मागील २४ तासांत इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे आणखी १७ जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या १६६ जवानांवर उपाचार सुरू असून, आतापर्यंत २८२ जवानांनी करोनावर मात केली आहे.

करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.

भारतात एक लाख लोकसंख्येमागे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण १४.२७ असून जगभरातील सरासरी प्रमाण ६८.२९ इतके आहे. देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू झाले आहेत.