उपअधीक्षिका सुजाता पाटील यांनी अनिकेत कोथळेच्या मुलीची भेट घेतली

खाकी वर्दीतील कृष्णकृत्यामुळे बापाच्या प्रेमाला पारख्या झालेल्या अनिकेतच्या साडेतीन वर्षांच्या प्रांजलला आज खाकी वर्दीचाच न कळत्या वयात आधार मिळाला. हिंगोलीच्या उपअधीक्षिका सुजाता पाटील यांनी शनिवारी बालसुलभ अपेक्षा लक्षात घेत खेळण्यातील बाहुली भेट देत प्रांजलच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. तातडीची मदत म्हणून अनिकेत कोथळेची पत्नी संध्या हिला २५ हजाराचा धनादेशही दिला.

सांगली शहर पोलिसांच्या कोठडीत बेदम मारहाणीमध्ये अनिकेत कोथळे याचा ६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. ही बाब लपविण्यासाठी मारहाण करणाऱ्या पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह अंबोलीला नेऊन जाळला. यामुळे खाकी वर्दीबाबत तीव्र संतापाची लाट पसरली होती, मात्र यातून दिलासा देणारी घटनाही सांगलीकरांनी शनिवारी अनुभवली.

हिंगोलीच्या उपअधीक्षिका सुजाता पाटील यांनी आज कोथळे कुटुंबीयांची भेट घेउन घडलेल्या घटनेची माहिती घेत अनिकेतची मुलगी प्रांजल हिचे शिक्षणापासून लग्नापर्यंतचे पालकत्व स्वीकारले. या वेळी त्यांनी साडेतीन वर्षांच्या प्रांजलसाठी बाहुलीही दिली. या वेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी सांगितले, की घडलेली घटना निंदनीय असून, यामुळे कोथळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अनिकेतची आई, पत्नी व मुलगी रस्त्यावर आली आहेत. त्यांना काहीही कमी पडू नये आणि मुलीची फरपट होऊ नये, ती शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी आपण दर्शवली. या बाबत पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे परवानगी मागण्यात आली. कोथळे कुटुंबाला महिन्याला काही रक्कम आपण देणार असून, अनिकेतच्या पत्नीला माझी लहान बहीण समजणार आहे. या वेळी पाटील यांनी संध्याला शनिवारी २५ हजाराचा धनादेश दिला.