औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील राजकारण नामांतराच्या विषयाभोवती फेर धरताना दिसत आहे. भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होत की, काय अशी चर्चा अधूनमधून बाळस धरताना दिसतेय. बाहेर काँग्रेस शिवसेनेत कितीही सामना रंगला असला, तरी ठाकरे सरकार मात्र स्थिर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीच याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीकडे राजकीय पक्षांनी लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक राजकारणावरून कुरघोड्याही सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात होणारी मागणी पुन्हा पुढे आली. औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली. त्याला काँग्रेसनं विरोध दर्शवला. त्यामुळे शिवसेनेकडून ‘सामना’तून काँग्रेसला सेक्युलर धडा शिकवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, काँग्रेस भूमिकेवर ठाम असल्याचं पक्षाच्या नेत्यांच्या विधानांवरून दिसत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी औरंगजेब धर्मनिरपेक्ष नसल्याचं सांगत काँग्रेसवर टोलेबाजी केली. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तरही दिलं. पण, शिवसेना-काँग्रेसमधील नामांतराच्या सामन्यावरून सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न चर्चांमध्ये डोकावू लागला होता. त्यालाही बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडत निकाल काढलं.

“भावनेच्या राजकारणाला थारा नाही”

“महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही,” असं स्पष्ट करत अप्रत्यक्षरीत्या भाजपाला उत्तर दिलं आहे.