औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेसमध्ये ‘सामना’ रंगू लागला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलरवादावरून काँग्रेसला टोले लगावले. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत,” असं म्हणत राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. या टीकेनंतर काँग्रेसनंही भात्यातून बाण काढत शिवसेनेच्या दिशेनं रोखला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला लक्ष्य करत काही सवाल केले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘सामना’तील संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. “औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?,” असा सवाल थोरात यांनी शिवसेना-भाजपाला केला आहे.
“गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे,” असं थोरात म्हणाले.
“भाजपाकडे जनता करमणूक म्हणून बघते”
“राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,” असा इशारा देत थोरात यांनी नामांतराबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 2:53 pm