News Flash

…पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत; संजय राऊतांचा काँग्रेसला चिमटा

नामांतरविरोधी सूर लावणाऱ्या काँग्रेसला दिलं 'रोखठोक' उत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र/पीटीआय)

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याभोवती राज्यातील राजकारण फिरताना दिसत आहे. याच विषयावरून भाजपा सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून नामांतराला विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून चिमटा काढला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. भाजपाकडून करण्यात आल्यानंतर काँग्रेसनं नामांतराला विरोध केला आहे. औरंगजेब सेक्युलर असल्याचा युक्तीवाद काँग्रेसकडून करण्यात आला. त्याचबरोबर सातत्यानं काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला आहे.

“हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात? औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही. मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री ‘औरंगाबाद’ नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच,” असं म्हणत राऊत यांनी नामांतर करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे.

“औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. शहाजहान हा औरंगजेबाचा बाप. बापाने त्याला 1657 साली दक्षिणेत पाठवले. विजापूर, गोवळकोंड राज्यांवर स्वाऱया करून औरंगजेबाने हाहाकार माजवला. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने ‘औरंगाबाद’ शहर वसविले. औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱहेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता,” असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

इतिहास पुन्हा वाचा

“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या कांग्रेसला टोले लगावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 7:45 am

Web Title: maharashtra politics city renaming politics aurangabad sambhajinagar congress shivsena sanjay raut balasaheb thorat bmh 90
Next Stories
1 राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; दिवसभरात ६४ टक्के जणांनी घेतली लस
2 दिलासादायक : राज्यात दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
3 महाराष्ट्राला मागणीपेक्षा कमी लसीचा पुरवठा, राजेश टोपे यांचा पुन्हा तक्रारीचा सूर
Just Now!
X