21 January 2021

News Flash

देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील कोरे-आवाडे यांच्या भेटीला

भाजपाकडून बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपाचे दोन दिग्गज नेते कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी रविवारी संध्याकाळी कोल्हापुरात येत आहेत. या भेटी खाजगी स्वरूपाच्या असल्या, तरी बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर त्याचे राजकीय संदर्भ काय असणार याची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

केंद्र शासनाने कृषी कायदे केले असून, त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या कायद्याचे समर्थन करण्यासाठी भाजपा किसान सभा व रयत क्रांती संघटनेच्यावतीने आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे इस्लामपूर येथे रविवारी सायंकाळी येत आहेत. तेथील सभा संपल्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांची फडणवीस व पाटील रात्री भेट घेणार असल्याने त्याकडे लक्ष वेधले आहे.

सर्वप्रथम फडणवीस हे माजी मंत्री आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या भेटीसाठी वारणानगर येथे जाणार आहेत. आमदार कोरे यांच्या आई सावित्रीबाई कोरे यांचे अलिकडेच निधन झाले होते. फडणवीस सात्वंनपर भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यानंतर ते तेथून इचलकरंजी येथे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना भेटणार आहेत. त्यांच्या पत्नी इंदुमती आवाडे यांचे अलिकडे निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी फडणवीस भेटणार आहेत. तसेच यावेळी ते कल्लाप्पा आवाडे यांना व भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचीही भेट घेणार आहेत.

दरम्यान, कोरे व आवाडे या दोघांनीही भाजपाच्या संपर्कात राहावे, असाही प्रयत्न भेटीतून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूर महापालिका, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा महत्त्वाच्या निवडणूका नजिकच्या काळात होणार असून, जिल्ह्यातील हे दोन नेते भाजपासोबत असणे ही भाजपाची गरज आहे. त्यामुळे हे बेरजेचे राजकारण करण्याचा उद्देश या दौऱ्यामागे असल्याची चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 4:39 pm

Web Title: maharashtra politics devendra fadnavis and chandrakant patil will meet kalappa awade and vinay kore bmh 90
Next Stories
1 आधी स्वबळावर लढणार मग एकत्र येणार! काँग्रेसने स्पष्ट केली निवडणुकीची रणनिती
2 “चंद्रकांत पाटील यांचे विरोधक त्यांच्याच पक्षात आहेत”
3 आशिष शेलार यांच्यावर राजू शेट्टी यांची टीका
Just Now!
X