शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर मोदी सरकार आणि राज्यातील भाजपा नेत्यांविरोधात संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेचा सूर लावला. आघाडीतील नेत्यांना आणि कुटुंबीयांना नोटीस म्हणजे राजकीय सूडबुद्धी असा आरोप शिवसेनेने केला. अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई झाली, तेव्हा राऊत यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शैलीत या कारवाया कायद्याप्रमाणे सुरू असल्याचं सांगितलं होते. त्याच मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक सल्ला दिला.

“तुझ्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात…”; संजय राऊत, शिवसेना भाजपा नेत्यांच्या निशाण्यावर

कंगना आणि अर्णबवर कारवाई करताना शिवसेनेनं अमिताभचा आणलेला आव कायम ठेवावा, असे त्यांनी ट्विट केले. त्याचसोबत त्यांनी व्हिडीओही ट्विट केला. “अभिनेत्री कंगना राणौत, पत्रकार अर्णब गोस्वामी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे खटले दाखल केले जातात तेव्हा तुम्ही त्याला कायद्याचं नाव देता. आणि तुमच्यावर कारवाई झाली तर मात्र ती राजकीय सूडबुद्धी असं तुमच्याकडून म्हटलं जातं. मी सांगेन ते धोरण आणि मी बांधेन ते तोरण हे उद्योग आता बंद करा. न्यायालयाच्या थपडा तुम्ही खाल्ल्या आहेत. घटनेचं राज्य तर दूर राहिलं पण महाराष्ट्रात साधं कायद्याचं राज्यही सध्या अस्तित्वात नाही. अहंकार आणि विद्वेष यांचं राज्य आहे. अशा गोष्टींबाबत न्यायालयात तुम्हाला थपडा मिळत आहेतच पण जनताही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, अशी जोरदार टीका त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली.

अर्णब गोस्वामी यांची त्यांच्याच शो मध्ये ‘बोलती बंद’; चर्चेसाठी आलेल्या प्रवक्त्याने सुनावलं…

सामनातील अग्रलेखावरूनही त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. “कार्यकरींनी ७०० शब्दांच्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द भांडार खुले करून विद्वत्तेचे प्रदर्शन केले आहे. (त्यापेक्षा) दोन ओळी त्या ५५ लाखांबद्दल खरडल्या असत्या, तर विषय संपला असता”, असे त्यांनी ट्विट केले. तसेच, ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं. “अर्णबवर कारवाई होते तेव्हा ‘कायदा त्याचे काम करत होता’ आणि आता?”, असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये केला.