शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. लागोपाठ आलेल्या ईडीच्या नोटीसांमुळे शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून, ईडीविरोधात सेना रस्त्यावर उतरणार असल्याचं वृत्त आहे. या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ५ जानेवारी रोजी त्यांची चौकशी होणार असून, यावेळी शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं वृत्त आहे. मुंबईसह जवळच्या शहर परिसरातून शिवसैनिक येणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या या शक्तीप्रदर्शनावरून आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
“शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?,” असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.
शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे..
हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ..
हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही..
हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही..
पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!
महाराष्ट्र धर्म?— nitesh rane (@NiteshNRane) January 3, 2021
ईडीनं नोटीस दिलेलं प्रकरण तुम्हाला माहितीये का?
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. या प्रकरणाचा तपास आता EDकडे देण्यात आलेला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2021 11:14 am