02 March 2021

News Flash

भाजपाचा आणखी एक नेता हाती बांधणार घड्याळ?; राष्ट्रवादी धक्का देण्याच्या तयारीत

"यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील सत्तांतराला वर्षपूर्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय स्थलांतराला सुरूवात झाली आहे. अलिकडेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्याचबरोबर  भाजपाचे काही आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यातच भाजपाचा आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाचे कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले. विशेष म्हणजे आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही काळे यावेळी म्हणाले. त्यामुळे काळे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे.

भाजपा नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार शुक्रवारी सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या भाषणाचीही जोरदार चर्चा रंगली आहे. “आपण यापुढे शरद पवार जे सांगतील, त्या पध्दतीने काम करू. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहेत. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार आहे,” असं कल्याणराव काळे भाषणात म्हणाले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सकाळी सरकोली येथे गेले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव काळे यांची उपस्थिती पाहून अनेकांच्या उंचावल्या आहेत. कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी काळेंनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील मोठं नाव आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमाध्ये गेले होते. काळे हे भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापकही आहेत. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 11:49 am

Web Title: maharashtra politics kalyanrao kale ncp president sharad pawar bmh 90
Next Stories
1 मुंबई-पुणे महामार्गावर मिनीबसचा अपघात; २ गंभीर जखमी
2 पालघर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला मिर्झापूरमधून अटक
3 आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही!
Just Now!
X