गेल्या वर्षी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. केवळ ८० तास टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकातून समोर आली आहे. या पुस्तका देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना केलेल प्रश्न आणि अजित पवार यांनी त्यावर दिलेली उत्तरं प्रियम गांधी यांनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. या शपथविधीची तयारी कशी झाली हे ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकात नमूद करण्यात आल्याचं प्रियम गांधी यांनी सांगितलं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या पुस्तकातील काही गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

“नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातील राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते देवेंद्र फ़डणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी शरद पवार यांना भाजपाला समर्थन द्यायचं असल्याचे संकेत त्यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित याबाबत अमित शाह यांना माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह हे उपस्थित होते,” असा दावा प्रियम गांधी यांनी केला.

अमित शाहंशी शरद पवारांची चर्चा

“त्या बैठकीत शरद पवार यांनी भाजपाला समर्थन देण्याची इच्छा असल्याचं अमित शाह यांना सांगितलं. कोणतं खातं कोणाला देण्यात येईल याबाबतही त्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती शासन आणण्यास ते मदत करतील असंही त्या बैठकीत ठरवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील परिस्थिती सांभाळून घेतली जाईल आणि माध्यमांसमोर येऊन लोकांची स्थिती पाहून महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन होण्याची आवश्यकता आहे. तसंच स्थिर सरकार देण्यासाठी मी आणि माझा पक्ष भाजपाला समर्थन देण्यास तयार आहोत हेदेखील ठरलं,” असं त्या म्हणाल्या. त्यावेळी शरद पवार यांनी केवळ अमित शाह यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर २० तारखेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचं प्रियम गांधी म्हणाल्या.

शिवसेना काँग्रेसचाही सरकार स्थापनेचा प्रयत्न

“यावेळी शिवसेना आणि काँग्रेसही राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. शरद पवार यांना कोणीही समजू शकत नाही. ज्यावेळी सरकार स्थापन करण्याची वेळ आली त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना अनेक गोष्टींचा त्याग करण्यास तयार होते. त्यामुळे सत्तेचं केंद्र राष्ट्रवादीकडे आलं असतं म्हणून कदाचित त्यांचं मन बदललं,” असा दावाही त्यांनी केला. “ज्यावेळी शरद पवार यांनी आपलं मन बदललं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या निर्णयाचं समर्थन केलं नाही. परंतु तोंडी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी तीन पक्षांचं सरकार चालणार नाही असं वाटत असल्याचं सांगत विरोध केला होता. भाजपालाही आपण समर्थन दिलं पाहिजे असंही ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना आपला जुना प्लॅनच पुढे नेण्यासाठी अजित पवार तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं,” असा दावा प्रियम गांधी यांनी केला.

नक्की काय घडलं हॉटेलमध्ये?

“त्यानंतर अजित पवार आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांना हे खरं आहे का असा सवालही केला. त्यानंतर त्यांनी हे खरं असल्याचं उत्तर दिलं. त्यावेळी अजित पवारांनी २८ आमदारांचं समर्थन असून अजून काही आमदारही आपल्याला समर्थन देतील असंही त्यांनी सांगितलं. त्यांना इतर आमदारांसोबतच ठेवून इतर आमदारांनाही आपल्याकडे आणण्यास त्यांना सांगू असं त्यावेळी ठरवण्यात आलं,” असंही त्या म्हणाल्या.


राष्ट्रपती राजवट हटवण्याचे प्रयत्न

“दोन्ही पक्षांमध्ये चर्चा घडवून आणणाऱ्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही. परंतु गेल्या सरकारमध्ये ते केंद्रीय मत्रीही होते आणि ते सध्याही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत,” असं प्रियम गांधी म्हणाल्या. “नेहरू सेंटरला २२ तारखेला एक बैठक झाली. त्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि त्यांना आता आपण थांबवू शकणार नाही असं वाटत असल्याचं म्हटलं. फडणवीस यांनी त्यानंतर अमित शाह यांच्याशी चर्चा केली. तसंच आपल्याला दावा करायचा असल्यास आपल्याला त्वरित दावा करावा लागेल असं शाह म्हणाले. तुम्ही त्वरित राज्यपालांकडे समर्थनाचं पत्र घेऊन दावा करण्यास जा असंही ते म्हणाले. त्यानंतर मी केंद्रातून राष्ट्रपती शासन कसं हटवता येईल हे पाहिन असंही ते म्हणाले. राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी आवश्यक असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी त्यावेळी वेळ नव्हता. त्यानंतर केंद्रातून त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच त्याचवेळी या ठिकाणीही राज्यपालांच्या निवासस्थानी तयारी सुरू झाली. अजित पावारांकडे आमदारांच्या सह्यादेखील होत्या. त्यावेळी त्यांनी राज्यपालांनी दावा स्वीकारला आणि राष्ट्रपती शासन हटवलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

… आमदारांचा पाठिंबा

“२८ आमदार अजित पवारांच्याच सोबत होते. परंतु ज्यावेळी अजित पवारांच्या जागी जयंत पाटलांची नियुक्ती करण्यात आली याची माहिती मिळाल्यानंतरही ते भाजपाला समर्थन देण्यास तयार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा प्लॅन पुढे गेलाच नाही,” असंही प्रियम गांधी यांनी नमूद केलं.