पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी (२ मे) जाहीर झाले. यात पश्चिम बंगालमधील निकालाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही निकालावरून सत्ताधारी पक्ष भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे. पाटील यांनी एक ट्विट केलं आहे.

“महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने बाजी मारली. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली, तर भाजपाने आवताडे यांना संधी दिली होती.