पक्षाला गळती लागलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपात सामील झालेल्या मधुकर पिचड यांच्यावर शरद पवार यांनी आज निशाणा साधला. अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना पिचड यांना चिमटे काढले. “राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली, त्याचवेळी जनतेच्या मनातल कळालं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं, ते झालं आहे,” असं म्हणत पवारांनी पिचड यांचा अप्रत्यक्षरीत्या समाचार घेतला.

माजी आमदार स्व. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. एकेकाळचे चांगले सहकारी असलेल्या मधुकर पिचड यांना पवारांनी नाव न घेता लक्ष्य केलं. पवार म्हणाले,”यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता. अकोले तालुक्यातील जनतेनं परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या, मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं,” असा टोला शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत पिचड यांना लगावला.

पुढे बोलताना पवार म्हणाले,”राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली. त्यावेळी जनतेच्या मनातल कळलं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं, ते झालं आहे. अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर २०० कोटींच‌ं कर्ज झालं. जे या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो,” अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. , असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.