16 January 2021

News Flash

सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; काँग्रेस नेत्याचा महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा

शरद पवारांचा नामोल्लेख टाळला

संग्रहित छायाचित्र

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावला असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात असतानाच काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसनं मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. “आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

एका मुलाखतीत शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधींच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. “हे गरजेचं नाही की, सगळ्यांचेच विचार स्वीकारले पाहिजेत. मी देशातील नेतृत्वाविषयी भाष्य करू शकतो, इतर देशातील नाही. सीमांचं पालन केलं गेलं पाहिजेत. कोणत्याही पक्षाचं नेतृत्व यावर अवलंबून असतं की, त्यांना पक्षामध्ये कशा पद्धतीनं स्वीकारलं जात आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे,” असं पवार म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 9:44 am

Web Title: maharashtra politics yashomati thakur warns leaders of maha vikas aghadi sharad pawar uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा
2 एकटेच लढणार आणि जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली; शिवसेनेचा टोला
3 विधान परिषद निवडणूक : भाजपला धक्का
Just Now!
X