‘एस’ झोनमधील टँकर माफियांचे रासायनिक सांडपाणी सोडणे सुरूच

बोईसर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तारापूरमधील कारखान्यांची तपासणी सुरू असतानाही याच औद्योगिक वसाहतीमधील काही भागात रासायनिक प्रदूषण सुरूच आहे.  याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी एस झोनमध्ये हा प्रकार निदर्शनास आणल्यानंतर  संबंधित कारखान्याची तपासणी करून रासायनिक सांडपाण्याचे नमुने महामंडळाने घेतले आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर येथील उद्योजकांवर लावलेल्या १६० कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या अनुषंगाने  मंडळाचे विशेष पथक तारापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दाखल आहे. अशा स्थितीत औद्योगिक क्षेत्रातील एस झोन मधील एका बंद असलेल्या कारखान्यातून जी झोन मध्ये असलेल्या एका बड्या उद्योजकाकडून   घातक रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याच प्रकाराची पुनरावृत्ती सोमवारी घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या बाबत  मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत व उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सत्तर बंगला भागातील एस झोन मधील पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले. त्या ठिकाणच्या काही अंतरावर असलेल्या एका रासायनिक कारखान्याची तपासणी केली असता नाल्यात सोडलेले रसायन हे सारखेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकारामध्ये तारापूरमधील एका बड्या उद्योग समूहाचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात येत असून गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर संबंधित उद्योगांवर कारवाई करण्यात येईल येईल, असे  प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले.

कोट्यवधीचा दंड तरीही प्रदूषण

राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरमधील आरती ड्रग्स या कारखान्याला कोट्यवधी रुपयाचा दंड ठोठावला आहे. तरीदेखील या उद्योजकाकडून वारंवार प्रदूषण सुरूच आहे. जी झोनमध्ये असलेल्या कारखान्यातून घातक रसायन हे टँकरने एस झोनमध्ये असलेल्या कारखान्यात सोडले जात आहे. औôोगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत आहे. तरी देखील या वाहिनीला असलेल्या चेंबरला छिद्र पाडण्यात आले आहे. यामुळे वाहिनीत सोडलेले रसायन पावसाळी नाल्यातून निघून जाते, असे येथे सांगितले जाते.