महाराष्ट्रातील सर्व खासगी शिक्षण संस्थांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून, या मागण्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शिक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त करत शुक्रवारपासून सुरू होणारे बेमुदत शाळा बंद आंदोलन मागे घेण्याची घोषणा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आणि त्यांचे पदाधिकारी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गुरुवारी भेट घेतली. त्यांच्या मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना अनुदानित शाळांप्रमाणेच शालेय पोषण आहार, थकीत वेतनेतर अनुदान, शिक्षक भरतीस परवानगी देणे, प्राथमिक शाळांमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करणे, सर्व शिक्षण संस्थांच्या शाळांना घरगुती दराने वीज बिलांची आकारणी करावी, आदी विविध मागण्यासंदर्भात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या मागण्या तावडे यांनी समजावून घेतल्या या मागण्या सकारात्मकरित्या लवकरात लवकर सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने १५ जुलैपासून पुकारलेले बेमुदत शाळा आंदोलन बंद मागे घेण्याचे जाहीर केले.