सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुराच्या प्रवाहात मालक आणि बैलांसह बैलगाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तास येथील शेतकरी संतोष पंढरी शंभरकर शेतातून परत येत असताना गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आला होता. बैलगाडीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून मार्ग काढत ते येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बैल टिकाव धरु शकले नाहीत आणि बैलगाडी पाण्यात वाहून गेली. ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

महिला वाहून गेली

समुद्रपूर येथील महिला शेतातील कामे करून परत येत असताना वाघाडी नाल्यावरील पुलावर पाय घसरल्याने वाहून गेली. रंभाबाई नामदेव मेश्राम असं या महिलेचं नाव असून अद्याप त्यांचाही शोध लागलेला नाही.

20 गावांचा संपर्क तुटलेला

नदी नाले ओसंडून वाहत असल्याने 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे. पोथरा नदीच्या पुराची पातळी वाढल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळीच कामानिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक अलीकडच्या गावात थांबालेले आहेत. वडगांव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक पूर्णतः थांबलेली असून सायगाव्हाण, सावंगी, लोखंडी, पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे. पिंपळगाववरून वडगांब येथे जाणा-या मार्गांवर असणारे नाले ओडसंडून वाहत असल्याने या चारही गावातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra rain bull cart wardha flood video viral sgy
First published on: 23-07-2021 at 09:04 IST