धवल कुलकर्णी

चीन, इटली आणि इराण यांच्यासारख्या देशांना हादरवून सोडणाऱ्या करोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सुद्धा सज्ज झाला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांनी करोना व्हायरसच्या योग्य त्या तपासण्या केल्या आहेत का? हे तपासण्यासाठी राज्य शासनाने सूचना केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली.

विमानाची सफाई करणाऱ्या कर्मचार्‍यांनासुद्धा संरक्षणात्मक सामग्री देण्यात येईल. त्याचप्रमाणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना करोनाची लागण झाली आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे. तिथे कर्तव्यासाठी ठेवण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात येईल.

करोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत नियमितपणे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपण यावर्षी करोनी व्हायरसचा धोका लक्षात घेता होळी साजरी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. होळी साजरी करा, पण मर्यादित स्वरुपात असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

आणखी वाचा- करोनाबद्दल महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण नाही – उद्धव ठाकरे

मागे स्वाइन फ्लूची साथ आली होती. त्यावेळेला मी, माझ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दहीहंडी साजरी करू नये असे सांगितले होते आणि सुदैवाने इतर पक्षाच्या मंडळींनी सुद्धा याचे अनुकरण केले होते असे ते म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य त्या सूचना संबंधित खात्याला करण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.