राज्यातील करोना संसर्ग आता कमीकमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून त्यावर आधारीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४३३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १२ हजार ५५७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,३१,७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,८५,५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Maharashtra Unlock : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी व आयुक्तांना स्पष्ट सूचना, म्हणाले…

दरम्यान,  “करोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक द चेन मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या.” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(रविवार) दिले आहेत. तसेच, “तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे.” असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असे स्पष्ट केले आहे.