महाराष्ट्रात २० हजार १३१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये करोनामुळे ३८० मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १३ हजार २३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ९ लाख ४३ हजार ७७२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २७ हजार ४०७ मृत्यू झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ४३ हजार ४४६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७१.२६ टक्के झाला आहे. आत्तपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४७ लाख ८९ हजार ६८२ नमुन्यांपैकी ९ लाख ४३ हजार ७७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १५ लाख ५७ हजार ३०५ लोक होम क्वारंटाइन आहेत तर ३८ हजार १४१ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज काय म्हटलं आहे?
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. बेड उपलब्ध करुन देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ हे सारं काही राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणे या गोष्टी करण्यात आल्या आहेत. तसंच करोनामुळे होणारे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकताही बाळगण्यात आली आहे असं राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.