राज्यात करोना संसर्ग अद्याप वाढत असला तरी, रूग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६० हजार २२६ रूग्णांनी करोनावर मात केली. तर, ४८ हजार ४०१ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५७२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. शिवाय, वाढती करोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाउनचा कालावधी देखील वाढवला गेला आहे. याचबरोबर केंद्रातील तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील धोका वर्तवला असल्याने, आरोग्ययंत्रणा अधिकच सक्रीय झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८६.४ टक्के एवढे झाले आहे. तर, आतापर्यंत राज्यात ७५ हजार ८४९ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,०१,७३७ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,१५,७८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid Crisis : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाची सज्जता – डॉ. प्रदीप व्यास

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील करोना उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागू शकतो हे लक्षात घेऊन ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना युद्धपातळीवर राबविण्यात येणार असल्याचेही डॉ.प्रदीप व्यास म्हणाले.