राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासांमध्ये राज्यभरात २० हजार ५९८ नवे करोनाबाधित आढळले. तर, ४५५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२ लाख ८ हजार ६४२ वर पोहचली आहे. एकीकीकडे करोना रुग्ण वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. चोवीस तासांत राज्यभरात २६ हजार ४०८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७३.७१ टक्क्यांवर पोहचला आहे.

राज्यातील एकूण १२ लाख ८ हजार ६४२ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले (अॅक्टिव्ह केस) २ लाख, ९१ हजार २३८ जण, डिस्चार्ज मिळालेले ८ लाख ८४ हजार ३४१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३२ हजार ६७१ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.  सद्यस्थितीस राज्यात १८ लाख ४९ हजार २१७ जण होम क्वारंटाइन आहेत. तर, ३५ हजार ६४४ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

करोना संकट अद्यापही टळलेलं नसून काही राज्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. करोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. २३ सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. गेल्या काही आठवड्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असून या राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक होत असल्यानेच नरेंद्र मोदी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.या सात राज्यांमध्ये देशात सर्वाधिक फटका बसलेल्या दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे