जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव, देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण २ लाख २३ हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या १ लाख २३ हजार १९२ जणांचा व करोनामुळे मृत्यू झालेल्या ९ हजार ४४८ जणांचा समावेश आहे. तर आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात ८९ हजार २९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

देशात करोनाची स्थिती गंभीर असून महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्रातही करोनाचे सर्वाधिक जास्त रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील करोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.

सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील ४८ तासांत २७८ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे राज्यात ७१ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या राज्यात १ हजार ११३ पोलीसांवर उपचार सुरू आहेत.