देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असला, तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील करोनामुक्त रुग्ण संख्या आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर आली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आज ३ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून, आतापर्यंत  राज्यात १ लाख ४० हजार ३२५ जणांनी करोनावर मात केली आहे.  दरम्यान, सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

मागील २४ तासांत राज्यभरात ७ हजार ८२७ नवे करोना रुग्ण आढळले तर १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहचली आहे. तर, १० हजार २८९ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०,सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात २४ तासांत २८ हजार ६३७ नव्या करोना रुग्णांची भर पडली आहे. तर ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळयांचेच लक्ष लागले होते.