राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाले आहे. तर, रूग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ देखील होत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही करोनामुळे रूग्णांचे मृत्यू सुरूच आहे. दरम्यान, दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांच्या व करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येतील तफावत आज काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात दिवसभरात १० हजार ५६७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, १० हजार १०७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, २३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५६,७९,७४६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८६,४१,६३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,३४,८८० (१५.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,७८,७८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,३६,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.