देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मात्र निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाहीत. करोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात १६ हजार ३६९ रूग्ण करोनातून बरे झाले, तर १० हजार ९८९ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, २६१ कोरनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.४५ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,०१,८३३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,६३,८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण १,६१,८६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी; मुंबई हायकोर्टाने फटकारलं

दरम्यान, करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. सर्जिकल स्ट्राइक कऱण्याची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर जवानांना एकत्र आणत आहात, मात्र शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. सर्जिकल स्ट्राइक करण्याची तुमची भूमिका असली पाहिजे असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असंही यावेळी कोर्टाने सांगितलं.