राज्यातील करोना संसर्गाचा वेग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. आज राज्यात तब्बल ११ हजार १४१ करोनाबाधित वाढले असुन, ३८ रूग्णांच्या मृत्युंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के एवढा आहे. आतापर्यंत राज्यात ५२ हजार ४७८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ९७,९८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही आकडेवारी सर्वसामान्यांसह राज्य सरकारची चिंता वाढवणारी आहे.

दरम्यान, आज ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २०,६८,०४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९३.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन; प्रत्येक शनिवार – रविवार पूर्ण बंद

मुंबई, पुणे या प्रमुख शहरांपाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाण आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आज औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून लॉकडाउनच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर आज अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला. ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशंत: लॉकडाउन असणार आहे. तर, प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.