देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात राज्यात १६ हजार ८३५ रूग्णांनी करोनावर मात केली असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाखांच्या वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढणारी करोनाबाधितांची संख्या आता काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात १४ हजार ३४८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांमध्ये राज्यात १६ हजार ८३५ जणांनी करोनावर मात केली असून आता राज्यातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख ३४ हजार ५५५ इतकी झाली आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १४ लाख ३० हजार ८६१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात ३७ हजार ७५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर ७९.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत राज्यात ७० लाख ३५ हजार २९६ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १४ लाख ३० हजार ८६१ जणांना करोनाचं निदान झाल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.