राज्यातील करोना संसर्ग आता कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत रोज भर पडतच आहे. शिवाय काही जिल्ह्यांमध्ये अजूनही करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवले जात असल्याचे जाहीर केले आहे. तर, आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक वृत्त समोर आले आहे. राज्यात आज १५ हजार ७७ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३३ हजार रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १८४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Maharashtra Lockdown : राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम!; काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करणार

”जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहातील असे काल जाहीर केले. तसेच,  जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यांमध्ये कदाचित निर्बंध शिथील केले जातील असं देखील ते म्हणाले होते.