राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ५१६ जण करोनामुक्त झाल्याने, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामुळे राज्यात आजपर्यंत करोनावर मात केलेल्यांची संख्या १८ लाख ९४ हजार ८३९ वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्क्यांवर आहे.

याशिवाय, राज्यात आज २ हजार २९४ नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ९४ हजार ९७७ वर पोहचली आहे. याशिवाय, आज ५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, आजपर्यंत राज्यात ५० हजार ५२३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत राज्यभरात १,३८,९५,२७७ नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी १९ लाख ९४ हजार ९७७ (१४.३६टक्के) नमूने पॉझिटव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ५८ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, १हजार ९९६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे.

पुण्यात दिवसभरात १८२ नवे करोनाबाधित, पाच रुग्णांचा मृत्यू –
पुणे शहरात दिवसभरात १८२ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आजअखेर शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८३ हजार ४७७ झाली आहे. तर, आतापर्यंत ४ हजार ७१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३३५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर १ लाख ७६ हजार ६५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.