राज्यात दिवसभरात २३,८१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, ३२५ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ९,६७,३४९वर पोहोचला असून यांपैकी ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर अद्याप राज्यात २,५२,७३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील रुग्णांचा बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ असून तर करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.८७ एवढे आहे. तर ४८,८३,००६ नमुन्यांपैकी आज ९,६७,३४९ रुग्ण करोनाबाधित आढळून आले. आजचा संसर्गबाधितांचे प्रमाण हे १९.८१ टक्के आहे. राज्यात सध्या १६,११,२८० लोक होम क्वारंटाइन असून ३७,६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

पुण्यात दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २०७८ रुग्ण आढळल्याने, १ लाख ११ हजार ९१६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर २ हजार ६२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २०१३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९२ हजार ६१४ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात १ हजार २५९ जण करोनाबाधित आढळले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०२ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ हजार ७४७ वर पोहचली असून यांपैकी, ४५ हजार २१२ जण करोनातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ८१ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.