राज्यात अद्यापही करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. दिवसभरात राज्यात २ हजार ८५४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय १ हजार ५२६ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १६ हजार २३६ वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.३४ टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात ५८ हजार ९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत१८ लाख ७ हजार ८२४ जणांनी करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी .१९ लाख १६ हजार २३६ (१५.३९ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६४ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यानं दिली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून, त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का? हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

 तसेच, कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने २८ आणि २९ डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.