राज्यात करोना संसर्ग अद्याप सुरूच आहे. मात्र दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. एवढच नाहीतर करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. मात्र असं जरी असलं तरी अद्यापही करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येने भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ३७१ रूग्ण करोनातून बरे झाले, तर २९ हजार ९११ नवीन रूग्णांचे निदान झाले. याशिवाय, ७३८ रूग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५०,२६,३०८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतली आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८५ हजार ३५५ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२१,५४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९,३५,४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,८३,२५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे शहरात दिवसभरात ४४ मृत्यू – 

पुणे शहरात दिवसभरात ९३१ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ४४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ४ लाख ६३ हजार १०३ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ७ हजार ८८७ रूग्णांचा मृत्यू झाल आहे. याच दरम्यान १ हजार ७६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ४० हजार १७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.