राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. दररोज करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार १६० करोनाबाधित आढळले, तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत राज्यात २ हजार ८२८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ५० हजार १७१ वर पोहचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९४.८७ टक्के आहे.

सध्या राज्यात ४९ हजार ६७ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ५० हजार १८९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे राज्यात आजपर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४९ हजार ७५९ वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या १,३०,६१,९७६ नमुन्यांपैकी आजपर्यंत १९ लाख ५० हजार १७१(१४.९३ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ५५७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ७८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही -आरोग्य मंत्रालय

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोना लसीकरणा संदर्भात आज एक मोठी माहिती देण्यात आली आहे. लसींना मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते. असं आरोग्य मंत्रालयाने पत्रकारपरिषद घेत सांगितलं आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असं देखील  यावेळी  सांगण्यात आलं आहे.