राज्यात मागील २४ तासांमध्ये आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ६ हजार १०७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय २५ रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५२ हजार ९०५ झाली आहे. तर, आतापर्यंत १९ लाख ७० हजार ५३ जण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३० हजार २६५ आहे. करोनामुळे राज्यात ५१ हजार ४१५ रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. करोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. यापूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केली होती.

केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी करोना चाचणी बंधनकारक

केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमधून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी सरकारचा आदेश बंधनकारक आहे. हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.