राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असल्याचं दिसत आहे. करोनाबाधितांच्या संख्येसह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. आज दिवसभरात ३ हजार ३१४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, दिवसभरात २ हजार १२४ जणांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १९ हजार ५५० वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट ९४.२९ टक्के आहे.

सध्या राज्यात ५९ हजार २१४ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,२,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १९ हजार ५५० (१५.३५ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची पालिकेने करोना चाचणी सुरू केली आहे. त्यात एक प्रवासी करोनाबाधित आढळून आला आहे. या प्रवाशाचा तपासणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी मुंबईतून पुणे येथील राष्ट्रीय संसर्गजन्य संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत जे प्रवासी ब्रिटनमधून महाराष्ट्रात आले आहेत, त्यांची यादी राज्य सरकारने स्थानिक जिल्हा, पालिका प्रशासनांना पाठविली आहे. या प्रवाशांच्या करोना चाचण्या, त्यांच्यावर ठेवायची देखरेख आणि प्रवासी करोनाबाधित आढळून आला तर घ्यावयाची दक्षता याविषयीच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.