राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसली, तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या आज दुपटीहून अधिक आढळून आली आहे. ही संख्या आतापर्यंत कधी करोनाबाधितांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत होती. मात्र आज हे प्रमाण दुपटीहून अधिक आढळून आले आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४१३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ८ हजार ३२६ रूग्ण करोनामधून बरे झाले आहेत. तर, ४९ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,३६,८८७ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.१६ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,२१,९१५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८५१८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७०,२८,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२१,९१५ (११.४४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८१,५६१ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत, तर १ हजार ७५२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४२,९५५ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.