राज्यात आता रोजच्या करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र ही बाब दिलासादायक असली तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. शिवाय म्युकरमायकोसीस या आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने लॉकडाउनचा कालावधी देखील वाढवलेला आहे. आज दिवसभरात राज्यात ५९ हजार ३१८ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३४ हजार ३८९ नवीन करनोाबाधित आढळले आहेत. तर, ९७४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४८,२६,३७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८१ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,११,०३,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,७८,४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,९१,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,६८,१०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid 19: लढाई कठीण होणार आहे, सज्ज राहा- उद्धव ठाकरे

करोनाविरोधातील लढ्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. एकीकडे कठोर निर्बंध लावण्यात आले असताना दुसरीकडे करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत करोनाविरोधातील लढाईत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित यावेळी उपस्थित होते.

कोविडची लढाई मोठी आहे भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी साद घालत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.