राज्यातील करोना संसर्ग अद्यापही थांबलेला आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र वाढ अद्यापही सुरूच आहे. तर, त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या दररोजच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ५९ हजार ७३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३४ हजार ८४८ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ९६० रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.२ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८० हजार ५१२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०८,३९,४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,४४,०६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,४७,६५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,९४,०३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.