राज्यातील करोना संसर्ग आता दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमाबंदी लागू करण्याचा निर्णय आज घेतला आहे. तर, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली जात आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

Coronavirus – राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

तसेच, आज दिवसभरात १७ हजार १९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला. आतापर्यंत राज्यात २३,००,०५६ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.२ टक्के आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या १,९०,३५,४३९ नमुन्यांपैकी २६,३७,७३५ नमूने (१३.८६ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १४,२९,९९८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर १४ हजार ५७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.