राज्यात करोना संसर्ग अद्याप सुरूच असला तरी देखील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता घट झालेली दिसून येत आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे करोनातून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून सलग राज्यात रोज आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत, करोनामुक्त झालेल्याची संख्या ही अधिक असल्याचे दिसून आले आहे. आज देखील राज्यात ७१ हजार ९६६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४० हजार ९५६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७९३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८७.६७% एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात ७७ हजार ९१९ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९८,४८,७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,७९,९२९ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,९१,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,५८,९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

“राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षांवरील नागरिकांना देणार दुसरा डोस”

दरम्यान,राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून, सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स राज्य शासन खरेदी करणार असल्याचे देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.